Saturday, 19 April 2014

एका कॉम्रेड ची साद

आपल्याकडे विचारवंतांनी वैचारिक ऊर्जेच्या निर्मितीत कसूर ठेवलेली नाही; परंतु या वैचारिक ऊर्जेचा प्रसार मात्र एखाद्याच व्यक्तिकेंद्री, पंथवादी संघटनेपुरता मर्यादित राहिल्याची खंत उरते किंवा त्या वैचारिक ऊर्जेवर भलत्याच लोकांनी आपापले आकडे टाकून तिचा गैरवापर केल्याचे चित्र दिसते.
हे असे महाराष्ट्रात वारंवार घडल्याने यातून विचारवंताचा पराभव झाला असे मानायचे का यावरील खलच अधिक वाढत जातो. असा खल करणारे हास्यास्पद ठरतात. याचे कारण असे की, विचारवंताच्या हयातीसोबत जणू सारे संपलेच, असे गृहीत या व्यर्थ चर्चामागे असते. यातून उघड होते ती चर्चा करणाऱ्यांची पराभूत मानसिकता.

प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्सवादी पक्षाचे संस्थापक कॉम्रेड शरद पाटील यांच्या निधनानंतर जी चर्चा होईल, ती तरी अशी होऊ नये. उलट, पाटील यांच्या निधनानंतर ‘श्रद्धेच्या ओंजळी’ वाहून मोकळे होण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक मांडणीची आणि या विचारांच्या प्रसार-अपप्रसाराची चर्चा करण्यात मराठीजनांना रस आहे, हे महत्त्वाचे मानले जावे. परंतु तसे होणार नाही. शरद पाटील यांचे लिखाण आम्ही वाचलेच नाही असे सांगणारे भरपूर आणि पाटील यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या सात पैकी दोन-तीन पुस्तके वाचूनसुद्धा पाटील यांच्यावर बुद्धविरोधी, ब्राह्मणविरोधी, मार्क्सविरोधी, आंबेडकरविरोधी, असा कोणताही एक शिक्का मारण्यास उत्सुक असलेलेही कमी नाहीत. त्यामुळेच पाटील यांच्या निधनानंतर तरी त्यांना समजून घेतले जावे, ही अपेक्षा मुद्दामहून मांडावी लागते.
भारतीय इतिहासाचे अधिक मूलगामी अर्थ लावण्याची कॉ. पाटील यांची तळमळ त्यांना दामोदर धर्मानंद कोसंबी किंवा लोकायतकार देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या पंक्तीत नेऊन बसविणारी आहे. त्यामुळे पाटील हे केवळ महाराष्ट्राचे ठरत नाहीत. परंतु चट्टोपाध्याय किंवा कोसंबी यांच्याहीपेक्षा एका भाषक समाजाची- महाराष्ट्रीय समाजाच्या ताण्याबाण्यांची जाण संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील एक सैनिक, एक मार्क्सवादी कार्यकर्ता आणि पुढे इतिहासतज्ज्ञ- विचारवंत अशी ओळख असलेल्या पाटील यांना होती. हे प्रादेशिकत्व मोलाचेच आहे.
कम्युनिस्ट पक्षातील १९६४च्या फुटीपूर्वीपासून पाटील त्या पक्षात होते. त्यापुढील १४ वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात राहून अखेर १९७८च्या ऑक्टोबरात त्यांनी स्वत:च्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने या पक्षाची संभावना ‘दोन तालुक्यांपुरता पक्ष’ अशी केली होती. परंतु हा पक्ष फारसा सत्ताकांक्षी नव्हताच आणि त्याचे नेते शरद पाटील हेदेखील रूढार्थाने नेते नसून विचारवंतच होते. कम्युनिस्टांनी भारतीय समाजाचे वर्ण-जाती संदर्भ जसे समजून घ्यावयास हवे होते तसे कधीच घेतले नाहीत, या घुसमटीची पराकोटी म्हणजे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष.
हे संदर्भ समजण्यासाठी, इतिहासातील एकेका घटनेचे खरेखोटेपण तपासण्यात धन्यता मानण्याऐवजी इतिहासाची सामाजिक, राजकीय आदी अंगे तपासून त्यांचा अन्वयार्थ लावण्यावर पाटील यांनी भर दिला. अन्वयार्थ का लावायचा, याबद्दल कॉ. पाटील यांची दृष्टी स्वच्छ होती. जे दिसते ते क्षणिक सत्य असू शकते, त्यामुळे नेणिवेच्या पातळीवर जे समजते त्याचा व दिसणाऱ्या सत्याचा एकत्रितच विचार केला पाहिजे, ही शिकवण त्यांनी सुमारे साडेचौदाशे वर्षांपूर्वीचा बौद्ध दार्शनिक दिग्नाग याच्याकडून घेतली. दिग्नागाचे हे सौत्रांतिक दर्शन पाटील यांनी समाजकेंद्री प्राच्यविद्या व सामाजिक इतिहासलेखनातील एक प्रमाणशास्त्र किंवा एपिस्टेमॉलॉजी म्हणून विकसित केले. पाटील यांच्याशी अनेकांचे, अनेक विषयांबाबत वाद झाले, ते याच प्रमाणशास्त्रामुळे. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षालाच सौत्रांतिक प्रमाणशास्त्रातून आलेल्या संशोधनपर अन्वयार्थाची बैठक दिली. त्याआधी मार्क्सवादाला फुले, आंबेडकरवादाची जोड द्यायला हवी असे ते म्हणत होते. हा त्यांचा मार्क्स-फुले-आंबेडकर (माफुआं)वाद. मात्र उत्तरायुष्यात, माफुआंवादाच्याही मर्यादा जाणवल्याने आपण सौत्रांतिक समाजवादाची मांडणी करीत आहोत असे पाटील म्हणाले आणि त्यांच्या विरोधकांत भरच पडली.
सौत्रांतिक समाजवादी मांडणीतील कच्च्या दुव्यांची चर्चा यापुढेही होत राहील; परंतु पाटील यांचे वाद झडले ते या मांडणीतून कुणाचे तरी महत्त्व नाकारले जाते म्हणून.स्त्रीसत्ताक गणसमाज हा ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम’चा पाया आहे, असे पाटील म्हणाल्याने एकाच वेळी नवबौद्ध आणि कम्युनिस्ट, दोघांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते.
शिवाजी महाराजांनी छत्रपती होण्यापूर्वी -राज्याभिषेकापूर्वी- केलेला आंतरजातीय विवाह हा खरे तर शाक्तपंथाचा दीक्षाविधी होता, शिवरायांच्या किल्ल्यांवर सर्व जातीजमातींचे लोक असणे हे केवळ वैचारिक उदारतेचे लक्षण नसून प्रचलित (ब्राह्मणी) सामाजिक उतरंडीशी जाणीवपूर्वक केलेला तो संघर्ष होता, असे अन्वयार्थ ही पाटील यांनी मांडले.यापैकी सोयीचे तेवढेच त्या-त्या अनुयायांनी किंवा अस्मितावाद्यांनी स्वीकारले.एरवी, पाटील यांचे अन्वयार्थ गैरसोयीचे वाटावेत आणि म्हणून त्यांच्यावर टीका व्हावी हाच क्रम सुरू राहिला होता. पाटील यांच्या या मांडणीमागची जात्यंताची कळकळ समजून घेण्याची तसदी यापुढे तरी घेणे आवश्यक आहे.
हयात असताना पाटील यांचे सहा फुटी करारी व्यक्तिमत्त्व, अनेक संकल्पनाव्यूहांचे त्यांना असलेले अंतर्बाह्य़ आकलन, शब्दांवरील त्यांचे प्रभुत्व आणि एवढे असूनही वादांमध्ये स्वत:ची बाजू मांडताना विरोधकाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्षही करण्याची त्यांची हातोटी, आदी वैशिष्टय़ांमुळे पाटील यांचे आव्हानच मोठे होते आणि ते स्वीकारण्याच्या ऊर्मीपायी अनेकांनी त्यांच्याशी वाद घातले. आता पाटील नाहीत, त्यामुळे अशा वादांतील लौकिक हारजितीचा मुद्दा संपुष्टात आला आहे. पाटील यांची बाजू विरोधकांनीही आधी समग्रपणे समजून घ्यावी यासाठी हे कारण पुरेसे आहे.

अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र हा पाटील यांचा ग्रंथ हे लेखसंकलन आहे. कोसला ही कादंबरी, उत्सव हा चित्रपट, हयवदन हे नाटक अशा गाजलेल्या कलाकृतींवर पाटील यांनी लिहिलेले लेख या संग्रहात आहेत. प्राध्यापकी थाटा-घाटात घुटमळत राहिलेली मराठी समीक्षा वाचण्याचा कंटाळा कुणालाही येतो, तसे या संग्रहाचे होत नाही. वैचारिक साधने दूरची असोत वा जवळची, इतिहासातील असोत वा आत्ताची, त्यांची सांगड घालणारा विचारव्यूह या लिखाणाने रचला आहे. आपण पाहातो कसे, आपल्याला साहित्याकडून काय हवे असते आणि आपल्या सौंदर्यकल्पना आज जशा आहेत त्या तशाच का आहेत, हे प्रश्न वाचकाला या पुस्तकातून पडतात आणि तो सुजाण होतो.
भारतीय समाज कसा घडला, मातृसत्ताक व्यवस्थेपासून ते मुसलमानी आक्रमणांच्या आधीपर्यंतच्या बहुधर्मीय भारतीय समाजाचे पितृसत्ताक जाती-वर्णामध्ये कसे होत गेले, वर्ण आणि वर्ग हे भारतीय संदर्भात एकच मानावेत काय आणि जातिअंताच्या सांघिक कृतींचापराभव भारतीय समाजाने कसकसा केला, अशा अनेक प्रश्नांपर्यंत पाटील यांच्या अन्य पुस्तकांचे वाचक जातात, यापुढेही गेले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तरे पाटील यांच्या साथीने शोधायची तर आपापले राजकारण, आपापल्या अस्मिता हे जरा बाजूला ठेवावे लागेल. परंतु मराठीजनांची स्थिती अशी झालेली आहे की अब्राह्मणी हा शब्द आला रे आला की हे काही तरी ब्राह्मणविरोधी असणार, अशा वैचारिक भिंती तयार होतात. ‘आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे’ या समर्थवचनाचा विसर अशा वेळी पडतो आणि आपणच जपत असलेल्या दुहीचे आपल्याला काही वाटेनासे होते, असा आजचा काळ आहे. या दुहीमुळे कॉ. शरद पाटील यांच्या लेखनातील सत्त्वाकडे त्यांच्या हयातीतही लोकांनी सर्वस्तरीय दुर्लक्ष केले.यापुढेही हे दुर्लक्ष सुरूच राहण्याचा धोका आहे.

शिवाजी-संभाजीचा शाक्तपंथ सांगणारे पाटील एका जातीला नको असतील, तर कम्युनिस्टांचा ब्राह्मणीपणा उघड करू पाहणारे पाटील आणखी एका जातीला. तरीही आपण  जातवादी नाही, हे सांगण्यास सारे तयारच. अशा कठीण काळातही पुस्तकरूपाने शरद पाटलांसारखा कॉम्रेड -साथी, सहकारी, सहप्रवासी- आपल्या वैचारिक प्रवासाला सत्यशोधनाची साद घालत राहणार आहे. ती आपण ऐकायला हवी.
( साभार - गिरीश कुबेर लोकसत्ता १४ एप्रिल २०१४ )

http://newshunt.com/share/28466148 Source:Loksatta

प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील

प्राच्य विद्यापंडित कॉ. शरद पाटील : जाती वर्चस्ववादाच्या विरोधातील एक झंझावात
लेखक -प्रा.रणजीत परदेशी

राजकारण, इतिहास आणि संस्कृतीकरण या तिन्ही क्षेत्रात शरद पाटील यांनी दिलेले योगदान परंपरावादाच्या आणि जातीवर्चस्ववादाच्या बंदिस्त चाकोऱ्यात उध्वस्त्त करणारे राहिलेले आहे.त्यांचे कार्य पारंपरिक अभिजनवर्गाच्या हितसंबंधावर हल्लाबोल करण्यापुरते, नकारात्मक स्वरूपाचे नाही तर अब्राम्हणी छावणीतील नकारात्मक क्षेत्रात क्रांतिकारी भूवाटपाच्या लोकशाही क्रांतीचा नारा बुलंद करणारे आहे.त्याचवेळी मार्क्सवादी ते आंबेडकरवादी चळवळीतील विभूतीवाद प्रवृत्तीची चिरफड करणारे आहे.एका बाजुला पारंपरिक इतिहासातील शासक शोषक नायकांना देवत्वाच्या सिंहासनातून खाली खेचणारे आहे तर दुसऱ्या बाजूने शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी संघर्षमय राहिलेल्या सीता,शंबूक ते कबीर, शिवराय आदींना नायकत्व प्रदान करणारे राहिलेले आहे.आर्थिक,राजकीय क्षेत्रात अनेक लढायांमध्ये पराभूत झालेल्या विद्रोही चळवळींना त्यांचे न्याय्य स्थान पुर्नप्रदान करणारे आहे.अनेक ग्रंथ लिहून आणि वादळी सभा आणि झंझावाती शिबिरे महाराष्ट्रभर गाजवून कॉ.शरद पाटलांनी गेली ३-४ दशके महाराष्ट्राच्या प्रबोधन विश्वाला नवीन झळाळी दिली.नवे प्रकाशमार्ग लखलखते केले.त्यांच्या या जीवनकार्याबद्दल हे मोजके शब्द...

● जाती व्यवस्था अंताशिवाय भारतात लोकशाही क्रांती अशक्य ●
"भारतातील जातीव्यवस्था ही शोषणशासनाची पायाभूत व्यवस्था आहे.भांडवली वर्गव्यवस्थेतही ती दुय्यम स्तरावर राहुनही पिळवणुकीत महत्त्वाची भूमिका वठविते.त्यामुळे जातीव्यवस्थेचा आर्थिक पाया उखडून टाकल्याशिवाय भारतात लोकशाही क्रांती अशक्य आहे."
हे कॉँ.शरद पाटील यांचे १९७८ पासूनचे प्रतिपादन राहिलेले आहे.आपल्या या प्रतिपादनाच्या सर्मथनार्थ त्यांनी गेली ४ दशके परिश्रम केले.त्यासाठी महाराष्ट्रात कॉ.पाटील यांनी सत्यशोधक मार्क्सवादी मासिकातून महाचर्चा सुरू केली.गेल ऑमव्हेटसारख्या विदुषी कार्यकर्तीन त्यात भाव दिला.सोशल सायंटीस्टकडे लेख पाठविले.मार्क्सवाद,फुले- आंबेडकरवाद या ग्रंथातून जाती संघर्षाचा इतिहास जातीव्यवस्थेचे अर्थकारण, जातीचे समाजशास्त्र अशा विविध आघाड्यांवर वैचारिक धुमश्चक्री उभी केली. समाजक्रांतीसाठी सक्रीय संघटन बांधणार्या मार्क्सवाद्यांपुढे अनेक वैचारिक आव्हाने उभी केली. जात व वर्ग यांच्या तात्वीक आकलनापर्यंत सारख्या निबंधाद्वारे वर्गाला 'परब्रह्म' अंतिम सत्य मानणाऱ्या पोथीवादाची भंबेरी केली.१९८० पासून सुरू झालेली ही चर्चा कॉ.पाटील यांच्या निधनापर्यंत थांबलीच नाही.

वर्गवादी कम्युनिष्टांना त्यांनी आवाहन केले, "रशिया व चीनमध्ये क्रांतीचा लाल बावटा फडकाविणाऱ्या क्रांतिकारकांनो भारतात अर्थोत्पादनाचा पाया जात असल्यामुळे जातीसंघर्षाशिवाय तरणोपायच नाही." जातीच्या अकलन पारंपरिक समाजवादी, गांधीवादी आणि मार्क्सवादी प्रवाहांनी अस्पृश्य ते पुरते सीमित केल्यामुळे ते सर्व जातीच्या जाती व्यवस्था आर्थिक पायावर उभ्या आहेत. त्याचे विश्लेषण करण्यापासून दूर राहिल्या. परिणामी धनदांडगे व जात लांडगे यांचेच फावले. त्यांचे आर्थिक वर्चस्व आणि राजकीय अर्धनेतृत्व कायम राहिले.

कॉँ.शरद पाटील यांनी भारतातील विषमतेला पायाभूत असलेल्या जाती व्यवस्थेसंबंधीच्या आकडेवारी पुढे आणली. भारतात क्रांतिकारी भू वाटप झाले नाही.युरोपीयन भांडवलदार वर्गाने त्यांच्या देशातील भूमिहीनांसाठी क्रांतिकारी भूवाटपाच्या क्रांतीला जहाल सुधारणेस पाठिंबा दिला. परिणामी खरेदी शक्ती असलेल्या वर्गाचे सबलीकरण झाले. व्यापारी आणि उद्योगाला चालना मिळाली. भारतात या प्रकाराची भूक्रांती झालेली नाही. चीनमध्ये ४४ टक्के जमीन वाटली गेली. भारतात मात्र ४ टक्केदेखील भूवाटप झाले नाही. परिणामी भारतात आर्थिक क्रांतीच्या वाटाही अडविल्या गेल्या आहेत, असे प्रतिपादन कॉ.शरद पाटील करतात. (संदर्भ सत्यशोधक एल्गार, वर्ष -१ ले, अंक -१२) जातीअंतासाठी उभी केली.

जातीव्यवस्थेचा ग्रामीण भारतीय आधार जातीनुसार असलेली जमीन मालकी आहे. तिचा उच्छेद केल्याशिवाय जातीसंलग्न सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट होणे अशक्यप्राय आहे हे कॉ.पाटील यांचे प्रतिपादन आहे. ग्रामीण महाराष्ट्र अथवा हरियाणा, पंजाब, यू.पी. यातील जातीय दमन झाल्याशिवाय पाठीमागे विषम भू-मालकीवर उभी जातीय रचना आहे. तिचा बीमोड झाला पाहिजे! कॉ.पाटील म्हणूनच आवाहन करतात- '...जातीअंत वर्ग आगमनाशिवाय होणार नाही, भांडवलशाही उत्पादन साधनांचा उदय झाल्याशिवाय होऊ शकणार नाही. देश आता जातीअंत क्रांतीला परिपक्व झालेला आहे. ही क्रांती वर्गक्रांतीपेक्षा जटील व कठीण आहे. (संदर्भ पूर्वोत्त)..

● जाती स्त्री-दास्यविरोधी इतिहास लेखन ●
कॉ. शरद पाटील यांनी भारतीय इतिहासाचे आकलन करताना ब्राह्मणीविरूध्द अब्राम्हणी अशा दोन विभागात वर्गवारी केली.ब्राह्मणी म्हणजे वर्णजाती स्त्री सर्मथक आणि अब्राह्मणी म्हणजे वर्णजाती स्त्री-दास्य विरोधक भारतीय समाजातील सांस्कृतिक संघर्ष ब्राह्मणीविरूध्द अब्राह्मणी छावणी यांच्या संघर्षाचा आणि संयोगाचा आहे, हे सूत्र कॉ.पाटील यांनी फुले-आंबेडकर वादाच्या प्रेरणेतून पुढे आणले. कॉ.पाटील यांनी पारंपरिक ब्राह्मणी- अब्राह्मणी वर्गवारीचे अद्यावतीकरण केले आणि भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेत महाप्रकल्पाचे महाद्वार इतिहास संशोधकांसाठी खुले केले. त्यासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे पुढील प्रमाण.े.

प्राचीन भारतातील प्रारंभिक संघर्ष-
उत्पादनव्यवस्था कृषी मायेवर आधारलेली होती. त्यामुळे कृषी मायेवर नियंत्रणअसलेली मातृसत्ता स्त्रीसत्ता यावर आधारलेला समाज होता. या समाजात स्त्री ही राष्ट्रदेवी वा भूमाता म्हणून श्रेष्ठ होती.पशुपालक शेतीच्या शोधामुळे पुरूषसत्तेच्या उदयास प्रारंभ होतो. रामायणातील, महाभारतातील पायाभूत संघर्ष मावळती स्त्री-सत्ता आणि उगवती पुरूषसत्ता यांच्यातील होता. सीता, शंबूक, तारका, द्रौपदी ही विद्रोहाची प्रतिके आहेत. पुराणकथांचा वापर पितृसत्तासर्मथक मूल्यांच्या प्रसारासाठी जातीवर्चस्ववादी शक्ती करतात. या कुप्रबोधनाच्या विरोधात नवासमतावादी विद्रोही आशय कॉ.पाटील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना देतात. 'मध्ययुगीन भारतीय संघर्ष हा शासक-शोबक जाती-जमातीविरुद्ध शासित-शोषित जाती-जमाती होता' हे सूत्र कॉ.पाटील विकसित करतातआणि शिवराय आणि संभाजी यांची कुळवाडी भूषण प्रादेशिक सत्ता बुडविण्यासाठी संघर्षात असलेल्या तुर्क-मोघल आणि ब्राम्हण वतनदार श्रेष्ठी यांच्या एकजुटीवर प्रकाश टाकतात. शिवरायांना जाती स्त्रीसर्मथक फॅसिस्ट शक्तींच्या मगरमिठीतून सोडविण्याचे इतिहास प्रबोधन परिवर्तकाच्या हाती देतात. भारतीय इतिहास लेखात जातवर्चस्ववादी शक्तींच्या इतिहास लेखनाच्या राष्ट्रविरोधी कारवाया उद्ध्वस्त करारी संशोधनपद्धतीच शोधकाच्या हाती येते ! भारताच्या इतिहास लेखनासअसे क्रांतिकारी वळण गेल्या पाच दशकात केवळ शरद पाटीलच देऊ शकले!

●  साहित्यकारण : सांस्कृतिक संघर्ष ●
तथाकथित मुख्य प्रवासी साहित्य चळवळ ही सामाजिक श्रेष्ठीजनांच्या मनोरंजन आणि साहित्यिक हितसंबंधांना बांधिलकी आहे. मुख्य म्हणजे ती जातिव्यवस्थापनाच्या संदर्भातदलित, ओबीसी स्त्रिया यांचा विद्रोह लढवून टाकते, दुसर्या बाजूला, प्रकाशन, संपादन, लेखन, शिक्षण आदि बौद्धिक उत्पादन साधनांवर नियंत्रण ठेवते. या मक्तेदारीच्या विरोधात कॉ.पाटील यांनी साहित्य सभेच्या प्रस्थापनेतून विद्रोह उभा केला. दलित, आदिवासी, ग्रामीण संयुक्त साहित्य सभेची निर्मिती करण्यासाठी डॉ.रावसाहेब कसबे, कविवर्य बाबुराव बागुल, डॉ.यादवआदींच्या नेतृत्वाखाली संयुक्त सभा स्थापन झाली. साहित्य चळवळीच्या क्षेत्रातील ही अभूतपूर्व घटनाराहिलेली आहे. तिच्या प्रेरणा घेऊन पुढे विद्रोही संस्कृती चळवळी उभ्या राहिल्या. कॉ.शरद पाटील यांच्या वैचारिक लेखनाचेमूल्यमापन करतांना भारतातील दिग्गज पंडितांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत- इरफान हबिब (सुप्रसिद्ध इतिहासकार) प्रतिपादन करतात की,आपले इतिहासलेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातून नव्या संशोधनाला प्रेरणा मिळेल. इतिहासतज्ज्ञ रोमीला थापरही अशीच प्रतिक्रिया देतात, सौंदर्यशास्त्र विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ.मे.पुं.रेगे यांनी प्रशंसा केली की, कॉ.पाटील हे विद्वत्तेचे खणखणीत नाणे आहे. विचारवंत अ.भि. शहा प्रतिपादन करतात की, मार्क्सवाद जगभर कोंडीत सापडलेला आहे. कॉ.पाटील यांचे लेखन या सोडवणुकीस उपयुक्त ठरु शकेल!

कॉ.पाटील यांच्या निधनाने अब्राह्मणी विचारधारेचे प्रचंड नुकसान झाले आहे.जातीव्यवस्था अंताचे कॉ.पाटील रणांगणातले महानायक होते. आदिवासींचा वनहक्क लढा, नामांतराचा जातीविरोधी संघर्ष,मंडल आयोगाची जातीविरोधी चळवळ, आदिवासी स्त्रियांसाठी सुधारित हिंदू कुळ कायदे यात कॉ.पाटील आणि त्यांची चळवळ पुढाकारावर राहिली शेतकरी संघटनेची शेतमाल भाव चळवळ केवळ अर्थवादी राहू नये म्हणून कॉ.पाटील यांनी शेतकरी स्त्रियांच्या मेळाव्याचा उपक्रम सुचविला. जातीलढा आणि वर्गलढा यांच्या समन्वयाचा झेंडा घेऊन कॉ.पाटील आयुष्यभर लढले. त्यासाठी मार्क्सवाद-फुले, आंबेडकरवाद यांची तात्वीक मांडणीही केली. जातीव्यवस्था अंतासाठी वैचारिक शस्त्रागार उभारणारा असा नेता विचारवंत गेल्या अर्ध शतकात महाराष्ट्रात झालेला नाही.
लेखक मो. ९८८१७३0७९८
( साभार - पुण्यनगरी २० एप्रिल २०१४ चौफेर )

Tuesday, 15 April 2014

जाणिव-नेणिव अन्वेषी तर्कशास्त्रकार कॉ.शरद पाटील

|| जाणिव-नेणिव अन्वेषी तर्कशास्त्रकार कॉम्रेड शरद पाटील ||

इतिहास हा 2 पद्धतीने अभ्यासता येतो

1) जाणिवेच्या ब्राम्हणी अन्वेषण पद्धतीने
आणि
2) नेणिवेच्या अब्राम्हणी अन्वेषण पद्धतीने.

हे सर्व प्रथम मांडुन इतिहासाचे अनेक न उलगडलेले पैलु सहज उजेडात आणणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे कॉ.शरद पाटील होय.
त्यांचे दिनांक 11 एप्रिल 2014 रोजी निधन झाले.त्यांच्या कार्याला सलाम.

कॉ.शरद पाटील यांनी जगाला निरुती ह्या आद्य गणमातेचा वारसा शोधुन देण्याचे काम सर्वप्रथम केले.जगभरातल्या अनेक देशांनी ते मान्य देखील केले.

वैराज अर्थात शाक्त धर्माच्या परुजिवनाच्या शंभुराजे,शिवरायांच्या कार्याला आधुनिक भारतात एकमेव लिखित पाठिंबा देणारे "द ग्रेट" संशोधक म्हनजे कॉ.शरद पाटील होत.
जाती अंताच्या लढ्याचा वर्ग व्यवस्थेत समावेशच होत नाही हे सिद्ध करुन मार्क्सची अनेक मते खोडताना त्याना फार त्रास झाला.म्हनुन स्वतंत्र मार्क्स-फुले-आंबेडकरवाद काढुन भारतात जाती निर्मुलनाचे काम त्यांना करावे लागले.
हे काम करत असताना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारखे एकाकी राहण्याचे दुःख आयुष्यभर त्यांच्या वाट्याला आले.
भारताने एक केवढा मोठा महापुरुष गमावला याचा अंदाज सुद्धा बांधता येणार नाही.
अलिकडच्या काळात एकांगी लिखाण करणाऱ्या लेखकांनी तर समग्र कॉ.शरद पाटील वाचलेच पाहिजेत.
नहुषाचे शिल्प हे भारताचे राट्रीय शिल्प व्हावे अशी त्यांची इछा होती.ती लवकरच पुर्ण होवो.

त्यांच्या कार्य कर्तृत्वाला हजारो वेळा सलाम..

नितिन सावंत
परभणी

साभार - nitinsawantparbhani.blogspot.in

Monday, 14 April 2014

साहित्यसूर्य कॉम्रेड शरद पाटील

|| छत्रपती सुत्र ||





● साहित्य क्षेत्रातील सुवर्ण पान - साहित्यसूर्य कॉम्रेड शरद पाटील ●

www.facebook.com/chhatrapatisutra




भारतीय साहित्य क्षेत्रातील प्रस्थापितांनी मांडलेल्या इतिहासाला संशोधनपुर्वक सत्याचे धक्के देत इतिहासाची नव्याने आणि अधिक उचित मांडणी करण्याचे महान क्रांतिकारक कार्य करणाऱ्या कॉ.शरद पाटील यांचे शनिवार दि.11 एप्रिल 2014 रोजी रात्री वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले.
खरे तर त्यांच्यासारखा "साहीत्यसूर्य" जरी मावळला असला तरी मावळण्यापुर्वी या सूर्याने आपल्या लेखणीच्या प्रकाशाने अनेक नवसाहित्यिकांसाठी साहित्य क्षेत्रातील प्रतिगामी अंधकार दुर करुन संशोधक वृत्तीचा सूर्योदय सुध्दा केला आहे.त्यांच्या लेखणीने दिलेले बळ इतके आहे की साहित्य क्षेत्रातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करुन त्या संकटावर मात करण्याची पात्रता आमच्या अंगी आली आहे.




** कॉ.शरद पाटील यांचा परीवार **
कॉ.पाटील यांच्या पश्चात त्यांच्या शिक्षिका पत्नी सुशीलाबाई,आदिवासी लेखिका नजुबाई गावीत,मुलगा शिल्पकार समरद व नचिकेत तसेच मुलगी प्राध्यापिका सुजाता शिंदे आणि सुना,नातवंडे असा परिवार आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचारांना आणि कार्याला शतशः प्रणाम करुन त्यांच्याविषयी चार शब्द...


|| कॉम्रेड शरद पाटील ||



** जीवनक्रम **
● कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म - 17 सप्टेंबर 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे तालुक्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला.
● 1942 ला ते मेट्रिक उत्तीर्ण झाले.
● 1942-43 त्यांनी कलाभवन वडोदरा येथे चित्रकला शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतला.
● 1943-45 मध्ये ते जे.जे.स्कुल ऑफ आर्ट ,बॉम्बे मधे दाखल झाले.
● 1945-47 मध्ये महायुध्दोत्तर पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ते सहभागी झाले.त्यानंतर शिक्षण सोडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात चित्रकार म्हणून कार्यरत झाले.
● 1947-49 मधे त्यांनी ट्रेड युनियन फ्रंट,धुळे मधे काम केले.
● 1949-50 ते हद्दपार राहिले.
● 1951-56 त्यांनी शेतकरी चळवळीत काम केले.
● 1956 नंतर त्यांनी आदिवासी लोकांसाठी चळवळीत काम केले ते मृत्युपर्यंत.
● 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.
● 1966 मधे दोनदा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी त्यांनी वास्तव्य केले.
● 1971-72 मधे त्यांनी "दास शुद्रांची गुलामगिरी" हा ऐतिहासिक ग्रंथ लिहला.
● 1978 मधे जाती व्यवस्थे विरोधात लढायला माकप ने नकार दिल्याने त्यांनी माकप चा राजीनामा दिला आणि मार्क्सवाद- फुले-आंबेडकर तत्त्वावर आधारलेला "सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष" त्यांनी स्थापन केला.
● 1982 ते 1993 पक्ष आपल्या पक्षाचे मुखपत्र "सत्यशोधक मार्क्सवादी" चे बारा वर्ष संपादन केले.
● 1987 मधे साक्री येथील दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन घेउन ते "नामांतर कृती समिती" मधे सहभागी झाले.
● 1994-95 त्यांनी "जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व, खंड 2" चे लेखन केले.
● मृत्यु - 11 एप्रिल 2014,धुळे.



** कार्य **
● गोतम बुध्दांनंतर Diloctical Logic ( तर्कशुद्ध युक्तिवादशास्त्र ) प्रथमच मांडणारे अत्यंत अभ्यासु जागतिक विचारवंत अशी त्यांची ओळख आहे.त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी विद्यापीठांमधे "विश्वासु संदर्भ साहित्य" म्हणुन अभ्यासक्रमात वापरले जाते.
● त्यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीचे खंडन आजपर्यंत कुणालाच करता आले नाही.
● कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या विचार विश्वाला कलाटणी देणारी अतुलनीय अशी विचारसंपदा निर्माण केली.त्यांनी भारतीय इतिहासाची नव्याने मांडणी करून नवे सामाजिक आणि राजकीय संदर्भ निर्माण केले.
● मुळचे चित्रकार असणाऱ्या कॉ.पाटलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा संबंध डाव्या चळवळीशी आला,त्यानंतर आयुष्यभर त्यांनी पुरोगामीत्वाचा पुरस्कार केला.
● जातिव्यवस्था अंताच्या प्रश्नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
● भारतातील जवळपास बहुतेक सर्व नामवंत विद्यापीठांत वेगवेगळे शिबिर आणि सभांद्वारे त्यांनी प्रबोधन केले.
● प्राचीन भारताच्या इतिहास अभ्यासाची एक नवीसंशोधन पद्धती त्यांनी पुढे आणली.त्यांनी समाजात परिवर्तन करु इच्छिणाऱ्या नवलेखकांन नवविचारांची साधने दिली.भारतीय प्रबोधनाचे शस्त्रागार अभ्यासकांना दिले.जाती वर्चस्ववादी पितृसत्ताकता यांच्या प्रभावातून इतिहासलेखनास मुक्त करण्याचे महत्कार्य त्यांनी केले.
● शिवराय,मार्क्स,महात्मा फुले,शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे खरे वारसदार म्हणून त्यांनी साहित्य,धर्म,विचारप्रणाली आणि संस्कृती यांच्या संदर्भात नवे सिद्धांत मांडले.त्यांनी केलेली मांडणी इतकी अभ्यासपुर्ण आहे की त्या मांडणीचे खंडन एकाही परीवर्तन विरोधी गटाला करता येणार नाही.
● मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद आणि "दासशुद्रांची गुलामगिरी' अशा ग्रंथांतून आणि "सत्यशोधक मार्क्सवादी' या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्न सामाजिक चर्चेच्या आघाडीवर आणण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य केले.
● त्यांच्या "जातीय सामंती सेवकत्व' आणि "भांडवली लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती" यांसारख्या ग्रंथांच्या माध्यमातुन भारतातील लोकशाही क्रांतीची नवी कार्यक्रमपत्रीका त्यांनी पुढे आणली.
** चळवळी **
● कॉ.पाटलांच्या राजकीय कार्यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण चळवळींचा उगम त्यांच्या पासुन झाला.
● महाराष्ट्रातील पहिली धरणग्रस्तांची चळवळ उकाई धरणाच्या निमित्ताने त्यांनी यांनी उभी केली.
● आज आदिवासी भूमिहीनांसाठी शासनाने वनकायदा पुढे आणला आहे.त्या कायद्यासाठी भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सुप्रिम कोर्टात कॉ.शरद पाटील आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी लढली.त्यासाठी नंदुरबार,साक्रीच्या आदिवासींच्या जनचळवळींनी वनकायद्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी उभी केली.
● आदिवासींचा आर्थिक लढा आणि नामांतराचा जातीविरोधी लढा यांच्या एकजुटीतून परिवर्तनासाठी संयुक्त चळवळ उभी करण्याचा पहिला प्रयत्न हा धुळे जिल्ह्यातून पुढे आला.
● शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यात स्त्रीसमतावादी लढ्याची दिशा देण्यासाठी पिंपळनेर ते चांदवड असा स्त्रियांचा महामोर्चा सत्यशोधक कष्टकरी महिला सभेने संघटित केला.
● डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून त्यांनी आदिवासींना नामांतराच्या चळवळीचा भाग बनविले.
● महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेय देखील कॉ.शरद पाटील यांनाच जाते.साक्री येथे पहिले संयुक्त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणावर आणण्याचे कार्य कॉ.पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केले.




** ग्रंथसंपदा **
● चार प्रमुख खंड
(A) खंड 1 -
भाग 1 व 2 दास-शुद्रांची गुलामगिरी ( इंग्रजी व मराठी )
भाग 3 रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष - शंबुक,एकलव्य,सीता,कर्ण,द्रौपदी,विधुर,कृष्ण
(B) खंड 2 -
भाग 1
जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व (इंग्रजी व मराठी)
भाग 2
शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महंमदी की ब्राह्मणी ?
(C) खंड 3 -
जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (इंग्रजी व मराठी),
(D) खंड 4 -
प्रिमिटिव्ह कम्युनिझम,मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (इंग्रजी व मराठी)
Caste Feudal Servitude खंड 2




** काही महत्वाची पुस्तके **
● अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र
● मार्क्स - फुले - आंबेडकरवाद
● भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत
● बुद्ध - भारतीय इतिहासातील लोकशाही,स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत
● पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका
● स्त्री शुद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता)
● शोध,मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा ?
● नामांतर - औरंगाबाद आणि पुण्याचे
● बुद्ध
● भिक्खू आनंद
● धम्म आनंद
● वधू विशाखा.




** पुरस्कार **
● कॉ.शरद पाटील यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव योगदानाबद्दल त्यांना 10 एप्रिल 2014 रोजी 18वा "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार" जाहीर झाला.वाई या ठिकाणी हा पुरस्कार त्यांच्या मानसकन्येने स्विकारला.
● अलीकडेच त्यांना महाराष्ट्र इतिहास संशोधन परिषदेच्या "महान इतिहासकार पुरस्कार" ने सन्मानित करण्यात आले.
● कॉ.शरद पाटील यांना नुकताच इतिहासकार "वा.सी. बेंद्रे पुरस्कार" प्रदान करण्यात आला.याशिवाय त्यांच्या साहित्याचा अनेक ठिकाणी गौरव झाला आहे..
अशा महान साहित्यिकास मानाचा मुजरा..!!


जय शिवराय
लेखक - अनिल माने.